दिल्ली: सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माझा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यासंदर्भात एक सविस्तर पत्रच या महिलेने सर्वोच्च न्यायालयाच्या 22 न्यायाधीशांना शुक्रवारी लिहिले आहे. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच सरन्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात आज विशेष सुनावणी घेण्यात आली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी एका 35 वर्षाच्या महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केल्याचे वृत्त स्क्रोल, लिफलेट आणि कारावान या न्यूज पोर्टल्सनी शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. या वृत्तानुसार पीडित महिला सर्वोच्च न्यायालयातील एक सामान्य कर्मचारी होती. 10 आणि 11 ऑक्टोबर 2018ला रंजन गोगोई यांनी तिचा शारीरिक छळ केला होता. ‘कंबरेभोवती हात ठेवून त्यांनी मला घट्ट मिठी मारली. संपूर्ण शरीराला स्पर्श केला. माझ्या देहावरची पकड त्यांनी अधिकच घट्ट केली आणि मला मिठी मार असा आग्रह त्यांनी केला. मी मात्र स्वत:ला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत होते,’ असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
प्रतिकार केल्यामुळे पीडित महिलेला रंजन गोगोई यांच्या घरी दिलेल्या कामावरून काढून टाकण्यात आले. डिसेंबर 2018मध्ये तिला सर्वोच्च न्यायालयातील नोकरीवरूनही बडतर्फ करण्यात आले. त्यासाठी परवानगी शिवाय सुट्टी घेतल्याचे कारण देण्यात आले. या महिलेचा छळ इथेच थांबला नाही. दिल्ली पोलिस दलात कॉन्स्टेबल असलेल्या तिच्या पतीला आणि दिरालाही 28 डिसेंबर 2018 रोजी बडतर्फ करण्यात आले. 11 जानेवारीला तिला सरन्यायाधीशांच्या घरी पाचारण करण्यात आले. गोगोई यांच्या पत्नीने जमिनीवर नाक घासून तिला माफी मागायला लावली. माफी का मागायला लावली, हे मात्र त्यांनी सांगितले नाही, असे पीडित महिलेने आपल्या पत्रात म्हटले आहे;पण अशी माफी मागूनसुद्धा 14 जानेवारीला कोणतेही कारण न देता तिच्या अपंग दिराला सर्वोच्च न्यायालयातून नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
9 मार्च 2019 ला राजस्थानमधील मुळ गावी आपल्या कुटुंबासोबत ही महिला गेली असता तिथे दिल्ली पोलिसांची धाड पडली. सर्वोच्च न्यायालयात नोकरी देते असे म्हणत एका इसमाला 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. याप्रकरणी पीडित महिला तिचा पती, दीर, त्याची पत्नी या सगळ्यांनाच ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतील तिलक मार्ग पोलिस ठाण्यात या सर्वांना डांबून ठेवण्यात आले. येथे पोलिसांनी त्यांना मारहाण व शिवीगाळ केली असा आरोपही या महिलेने आपल्या पत्रात केला आहे. 24 तास या सर्वांना अन्न-पाणीही देण्यात आले नाही. पोलिसांनी केलेल्या छळाचे व्हिडिओ फुटेजसुद्धा या महिलेने पत्रासोबत पाठवले आहे. या फुटेजमध्ये ही महिला व तिच्या पतीचे पोलिसांनी हात बांधले असल्याचे दृश्य दिसत आहे. सरन्यायाधीशांच्या सचिवांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.